विदर्भ, मराठवाड्यात कोसळणार धो-धो पाऊस; मोठा इशारा, मुंबईसह ‘या’ भागातही अलर्ट

पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने आजही राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. कोकणासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात जोरदार पाऊस झाल्यानंतर आता काही भागांत पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप संततधार सुरूच आहे.

सततच्या पावसामुळे मुंबई, पुणे आणि नाशिक परिसरातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मराठवाड्यासाठीही मोठी दिलासादायक बातमी आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा तब्बल 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.


दरम्यान, विदर्भातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही भागांत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे.
विदर्भात झालेला पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणार असून अनेक भागांतील पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे संकट असल्याची चर्चा होती; मात्र राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील भागातही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मेरठ, आग्रा, अलीगड आणि प्रयागराजसह अनेक शहरांमध्ये तापमान सामान्यापेक्षा सुमारे 6 अंश सेल्सिअसने खाली आले. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरे कोसळून 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हवामान विभागाने आगामी काळात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी सध्या राज्यातील अनेक भागांत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.