दौंडमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा मृत्यू; आई थोडक्यात बचावली


दौंड : पावसाळ्यात विजेच्या उपकरणांपासून आणि विद्युत तारांपासून विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. मात्र, दौंड तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने विद्युत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घरातील वीजेचं काम सुरू असताना विजेचा धक्का बसून दोन चुलत भावांचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील राहू गावातील सोनवणेमळा येथे आज सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.

ओम भोईटे आणि रोहित भोईटे अशी मृत चुलत भावांची नावे आहेत. अनिल भोईटे यांच्या घरी सकाळच्या सुमारास घरगुती वीजेचं काम सुरू होते. त्यावेळी ओम याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला.

ओमला विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच त्याचा चुलत भाऊ रोहित त्याच्या मदतीसाठी धावला. मात्र, ओमला वाचवण्याच्या प्रयत्नात रोहितलाही विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला.

दोघांना विजेचा धक्का बसल्याचे पाहून त्यांच्या आईनेही मुलांच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र, सुदैवाने त्या बचावल्या. त्यानंतर कुटुंबीयांनी दोन्ही तरुणांना तातडीने यवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी ओम आणि रोहित यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर सोनवणेमळा परिसरात शोककळा पसरली असून भोईटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्यात विद्युत उपकरणे, वायरिंग आणि वीजवाहिन्यांपासून नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!