मेगा शिक्षक भरतीला हिरवा कंदील: 31 मेपर्यंत ‘पवित्र’ पोर्टलवर जाहिराती; हजारो उमेदवारांना मोठी संधी

राज्यातील हजारो भावी शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून शिक्षण विभागाने 31 मे 2026 पर्यंत सर्व रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.

या भरतीची खास बाब म्हणजे केवळ सध्याची रिक्त पदेच नव्हे, तर मे 2026 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांमुळे रिक्त होणारी संभाव्य पदेही या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे पदसंख्या वाढून अधिक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांना त्यांच्या रिक्त जागांची नोंद ‘पवित्र’ पोर्टलवर 1 ते 31 मेदरम्यान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ (TAIT) परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. सुमारे २ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १ लाख ७० हजारांहून अधिक उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे. हे उमेदवार थेट भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.

ही संपूर्ण भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असल्यामुळे पारदर्शकता वाढणार असून वशिलेबाजीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे, मुलाखतीशिवाय होणार आहे. तर खासगी संस्थांना एका जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची मुभा देण्यात आली आहे.

जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जून महिन्यात उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शाळांचे पसंतीक्रम ऑनलाइन नोंदवता येतील. त्यामुळे दीर्घकाळापासून रखडलेली शिक्षक भरती आता मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे शाळांमधील शिक्षकांचा तुटवडा कमी होऊन राज्यातील शिक्षणाच्या दर्जातही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.