‘लालपरी’बाबत सरकारचा मोठा मास्टरप्लॅन! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत आगामी काळात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेनुसार एसटीचा ताफा टप्प्याटप्प्याने पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठीही आधुनिक यांत्रिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत ई-बस प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी 2029 पर्यंत एसटीच्या 50 टक्के, 2035 पर्यंत 80 टक्के आणि 2047 पर्यंत 100 टक्के बस इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यासाठी राज्यभर चार्जिंग केंद्रांचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले.
ई-बसच्या संचालनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. पुरवठादारांकडून बस मिळाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत तिची तपासणी पूर्ण करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच, खाजगी बस सेवा ज्या मार्गांवर धावतात त्या मार्गांवरही एसटीच्या ई-बस सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

राज्याच्या ई-वाहन धोरणानुसार सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी 1500 इलेक्ट्रिक बसांसाठी त्यांच्या मूळ किमतीच्या 10 टक्के किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. सध्या एसटी महामंडळ जीसीसी तत्त्वावर 5,150 इलेक्ट्रिक बसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना प्रदूषणमुक्त, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाचा 78 वा वर्धापन दिन प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बसस्थानकांचा गौरव करण्यात आला. ‘अ’ श्रेणीत बारामती, ‘ब’ श्रेणीत तिरोडा आणि ‘क’ श्रेणीत अकोले बसस्थानकांना सन्मानित करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 12 कर्मचाऱ्यांना अध्यक्ष सुवर्णपदक, तर सहा कर्मचाऱ्यांना लालपरी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात बसस्थानकांच्या यांत्रिक स्वच्छता उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. आतापर्यंत अनेक मोठ्या बसस्थानकांवर साफसफाईसाठी आठ ते दहा कामगारांना अर्धा तासाहून अधिक वेळ लागत होता. मात्र, नव्या यांत्रिक प्रणालीमुळे हेच काम अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण होणार आहे. शिवाय, दिवसातून दोन वेळा होणाऱ्या स्वच्छतेऐवजी आता दर चार तासांनी स्थानकांची साफसफाई केली जाणार आहे.
क्रिस्टल आणि स्मार्ट सर्व्हिस या कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, पुढील दोन महिन्यांत राज्यातील सर्व बसस्थानकांवर आधुनिक स्वच्छता यंत्रणा उपलब्ध होईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.