शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! PM Kisan चा 24 वा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २० जून रोजी २३ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागले आहे. मात्र, पुढील हप्ता मिळवण्यासाठी काही आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जून रोजी २३ वा हप्ता ऑनलाइन वितरित केला होता.
२४ वा हप्ता कधी मिळू शकतो?
सध्या उपलब्ध माहितीनुसार, २४ वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे.

‘ही’ कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक

पुढील हप्ता सुरळीत मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ॲग्रीस्टॅकमुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र फार्मर आयडी मिळतो. भविष्यात विविध कृषी योजना, पीक विमा आणि इतर शासकीय अनुदानाचा लाभ थेट मिळण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची मानली जाते.
ई-केवायसीसाठी आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक, ७/१२ उतारा, ८-अ आणि बँक पासबुक यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत.
हप्ता अडकू नये म्हणून काय कराल?
ई-केवायसी, आधार लिंकिंग, जमिनीची पडताळणी किंवा कागदपत्रांमधील नावातील त्रुटी वेळेत दुरुस्त न केल्यास २४ वा हप्ता अडकू शकतो. ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ता मिळालेला नसेल, त्यांनी अधिकृत PM-Kisan पोर्टलवर जाऊन आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात. त्यामुळे पुढील हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.