पुणे पोलीस दलात बनावट प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा! १९ जण बडतर्फ होणार, चौघांना बेड्या; नेमकं प्रकरण काय?

पुणे : पुणे शहर पोलीस दलातील भरती प्रक्रियेत खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘कुराश’ आणि ‘ड्रॅगनबोट’ या खेळांची बनावट प्रमाणपत्रे सादर करून १९ उमेदवार पोलीस दलात भरती झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व १९ जणांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्रशिक्षणासाठी गेलेल्या उमेदवारांनाही परत बोलावणार
या प्रकरणातील १९ उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून घेण्यात आले नव्हते. तर उर्वरित ९ उमेदवारांना विविध पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, बनावट प्रमाणपत्रांचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या नऊ जणांनाही तातडीने प्रशिक्षण केंद्रांतून परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित सर्व उमेदवारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


दहा वर्षांत स्पर्धा न घेताच कागदोपत्री नोंदी?
पुणे शहर पोलीस दलाच्या २०२४-२६ मधील भरती प्रक्रियेदरम्यान बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर झाल्याची गुप्त माहिती एका सजग नागरिकाने पोलिसांना दिली होती. संबंधित नागरिकाने पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली.
तपासादरम्यान २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या कालावधीत कुराश खेळाच्या प्रत्यक्ष स्पर्धा आयोजित न करताच त्या झाल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या नोंदींच्या आधारे बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा संशय असून, त्यांचा वापर करून १९ उमेदवारांनी पोलीस भरतीचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष आणि सचिवांना अटक
या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या कारवाईत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर आणि सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालकांचाही समावेश आहे. या केंद्रांवर बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता, कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटनांची माहिती गुन्हे शाखेने गोळा केली आहे. या संघटनांशी संबंधित संशयित पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे.
भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची पाळेमुळे शोधणार
बनावट प्रमाणपत्रांच्या या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न होणाऱ्या इतर व्यक्तींवरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
