‘मला माफ कर… वचन अर्धवट सोडतेय’; आजाराशी हरलेल्या वैष्णवीची शेवटची चिठ्ठी डोळे पाणावणारी

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका २६ वर्षीय विवाहित महिलेने दीर्घकाळाच्या असह्य आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेपेक्षा अधिक चर्चेत आहे ती तिची मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी. या पत्रात वैष्णवी उर्फ निक्की हिने कोणावरही आरोप न करता सासरच्या कुटुंबाचे कौतुक, पतीची माफी आणि माहेर-सासरच्या सदस्यांसाठीच्या तीन शेवटच्या इच्छा व्यक्त केल्या आहेत.

रावतपूर परिसरात राहणाऱ्या शिवम शुक्ला यांच्याशी वैष्णवीचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. शिवम मध्य प्रदेशात रेल्वे विभागात कार्यरत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या वैष्णवीने लग्नानंतरही शिक्षण सुरू ठेवले होते. नुकतीच तिने दिल्ली पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि अंतिम टप्पा बाकी होता. मात्र, तिच्या आयुष्याशी सुरू असलेली दुसरी लढाई अखेर ती हरली.
लग्नाआधीपासूनच वैष्णवीला संधीवाताचा गंभीर त्रास होता. पाठीच्या कण्यातील असह्य वेदनांमुळे तिचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. कानपूरपासून दिल्लीपर्यंत अनेक रुग्णालयांत उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. आपण कधीच बरे होणार नाही आणि भविष्यात कुटुंबावर ओझे ठरू, ही भावना तिच्या मनात खोलवर घर करून बसली होती.

१५ जुलै रोजी पती शिवम भोपाळहून घरी परतले असता वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या बाजूला एक पत्र ठेवलेले होते. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिठ्ठीत कोणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत. उलट, “मला इतकं प्रेमळ सासर मिळालं, हे माझं भाग्य आहे,” असे नमूद करत तिने सासू-सासरे, पती आणि दिराने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
पत्रात तिने तीन शेवटच्या इच्छा लिहिल्या आहेत. तिचे दागिने वडिलांना परत द्यावेत, ते भाऊ अभयच्या लग्नात उपयोगी पडतील, अशी पहिली इच्छा होती. दुसरी म्हणजे तिची स्कूटी अभयला द्यावी. तिसऱ्या इच्छेत तिने स्वतःचा मोबाईल सासू किंवा पतीला देण्यास सांगितले. “आई नवीन फोन घेणार नाहीत, म्हणून माझा फोन त्यांना द्या. मी तो आधीच फॉरमॅट करून ठेवला आहे,” असेही तिने नमूद केले.
पत्राच्या शेवटी वैष्णवीने पतीसाठी लिहिलेली ओळ सर्वाधिक भावूक करणारी ठरली. “मला माफ कर… अखेरपर्यंत साथ देण्याचं वचन मी पूर्ण करू शकले नाही. आजवर प्रत्येक शब्द पाळला, पण आता मी पूर्णपणे असहाय झाली आहे,” असे लिहित तिने आयुष्याचा निरोप घेतला.
या प्रकरणाचा तपास कानपूर पोलिसांकडून सुरू असून, प्राथमिक तपासात दीर्घकाळाच्या आजारामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. तिच्या शेवटच्या पत्रामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आजाराशी लढणाऱ्या व्यक्तींना वेळेवर मानसिक आधार मिळणे किती महत्त्वाचे आहे, यावरही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.