लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का! ५ लाखांहून अधिक महिलांचा ₹1500 हप्ता बंद; २१ वर्षे पूर्ण झालेल्यांनाही नाही अर्जाची संधी


पुणे : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यभर सुरू असलेल्या लाभार्थी पडताळणी मोहिमेमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अपात्र महिलांची संख्या वाढत असून हजारो नव्हे तर लाखो महिलांचा दरमहा मिळणारा ₹1,500 चा हप्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पडताळणीदरम्यान सर्वाधिक परिणाम सोलापूर जिल्ह्यात दिसून आला आहे. अधिकृत निकषांनुसार तपासणी केल्यानंतर सुमारे ५ लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिलांना मिळणारा आर्थिक लाभ थांबवण्यात आला असून, पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच पुढे योजनेचा लाभ मिळणार आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील सुमारे ५० हजार महिलांचाही हप्ता बंद झाला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे अनेक लाभार्थी महिलांनी योजनेतील ६५ वर्षांची कमाल वयोमर्यादा पूर्ण केली आहे. नियमांनुसार वयोमर्यादा पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थींचे नाव योजनेतून आपोआप वगळले जाते. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात अचानक पैसे जमा होणे थांबल्याने त्या चिंतेत आहेत.

याचबरोबर गेल्या दोन वर्षांत २१ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणी आणि विवाहित महिलांसमोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले नवीन अर्ज स्वीकारणारे ऑनलाइन पोर्टल अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पात्र असूनही हजारो महिलांना अर्ज करता येत नसल्याने त्या लाभापासून वंचित राहत आहेत.

एका बाजूला पडताळणीमुळे अपात्र लाभार्थींची नावे कमी केली जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला नव्याने पात्र झालेल्या महिलांना अर्जाची सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी वाढत आहे. यामुळे सरकारने लवकरात लवकर नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

दरम्यान, शासनाकडून पडताळणी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या अर्जातील माहिती, कागदपत्रे आणि पात्रतेचे निकष तपासून ठेवावेत. तसेच अधिकृत घोषणा आणि नोंदणी पोर्टल सुरू होण्याबाबतच्या अपडेट्सकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!