बीड बायपासवर काळाचा घाला; दत्तसंप्रदायाचे पूज्य कालिदास महाराज अपघातात अनंतात विलीन, भावजयचाही मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : दत्तसंप्रदायातील ज्येष्ठ संत आणि श्रीक्षेत्र गुंज (ता. पाथरी, जि. परभणी) येथील आध्यात्मिक परंपरेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे परमपूज्य कालिदास महाराज यांचे शुक्रवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला असून वाहनचालक गंभीर जखमी आहे. या घटनेने परभणीसह संपूर्ण मराठवाड्यातील भाविकांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालिदास महाराज हे दत्तसंप्रदायातील महान संत टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुजरातमधील श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम पूर्ण करून ते आपल्या सहकाऱ्यांसह श्रीक्षेत्र गुंजकडे परतत असताना पहाटे बीड बायपासवर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. अपघात इतका गंभीर होता की, कालिदास महाराज आणि त्यांची भावजय स्मिता बोरीकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनचालकाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कालिदास महाराज हे केवळ धार्मिक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर समाजप्रबोधनाचेही प्रभावी माध्यम होते. गेली तब्बल चार दशके त्यांनी अखंड मौनव्रत पाळत अध्यात्म, सेवा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी कधी मोठी भाषणे केली नाहीत, मात्र त्यांच्या आचरणातून हजारो लोकांना व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि आध्यात्मिक जीवनाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे नियमित येत असत.

महाराजांच्या निधनाची बातमी सकाळी समोर येताच श्रीक्षेत्र गुंजमध्ये शोकमय वातावरण निर्माण झाले. मठात भाविकांची मोठी गर्दी झाली असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहताना म्हटले की, “कालिदास महाराजांनी समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण दिली. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली असून त्यांनी निर्माण केलेली आध्यात्मिक परंपरा कायम प्रेरणा देत राहील.”
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाहनाचा वेग, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते तांत्रिक कारण याची चौकशी पोलीस करत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर ते श्रीक्षेत्र गुंज येथे आणले जाणार असून अंतिम दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
दत्तसंप्रदायाच्या परंपरेला आयुष्य वाहणारे, मौनातून लाखो भाविकांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारे कालिदास महाराज आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांचे कार्य आणि विचार भाविकांच्या स्मरणात कायम राहतील, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.