“हातभट्टी दारूला कायदेशीर दर्जा द्या!” रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

भिवंडी : “जर हातभट्टी दारू कायदेशीर केली, तर सरकारला महसूल मिळेल आणि गोरगरीब मजुरांचे जीव वाचतील,” असे वादग्रस्त विधान केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भिवंडी दौऱ्यात केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात नुकत्याच घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आठवले म्हणाले की, अनेक गरीब मजूर वर्ग स्वस्त दारूकडे वळतो. जर ही दारू कायदेशीर नियंत्रणाखाली आणली गेली, तर अवैध उत्पादनातून होणारे मृत्यू टाळता येतील आणि सरकारला कर महसूलही मिळेल, असा त्यांचा दावा आहे.
त्यांच्या या विधानामुळे विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि सामाजिक संघटनांकडून यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो, तर काही जण याला आर्थिक आणि व्यवहार्य दृष्टिकोन म्हणू शकतात.

याच वेळी त्यांनी मराठा आरक्षणावरही भूमिका मांडली. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याऐवजी 10 टक्के EWS कोट्यातून आरक्षण देता येऊ शकते, असे ते म्हणाले. तसेच जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी दाखला देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुसूचित जाती-जमातींच्या उपवर्गीकरणावर बोलताना त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी केली. “ज्याची जितकी लोकसंख्या, त्याला तितके आरक्षण” या तत्त्वावर निर्णय व्हावा, असे ते म्हणाले.
आरपीआय पक्ष विस्ताराबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सर्व समाजांना सोबत घेण्याचा सल्ला दिला. केवळ एका समाजावर आधारित राजकारण करून पक्ष वाढू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.