पैसे नव्हते म्हणून मुलीवर उपचार करता आले नाहीत, मुलीच्या मृत्यूनंतर बापाचे टोकाचे पाऊल, उपस्थित गहिवरले…

छत्रपती संभाजीनगर : पैशांअभावी १९ वर्षांच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाल्यावरून खचलेल्या पित्याने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. सोयगावात बापलेकीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी राऊत (वय १९ वर्षे) मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. दीपक प्रल्हाद राऊत (वय ४५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे.
सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. त्यातच त्यांची मुलगी वैष्णवी हिला पोटात त्रास होऊ लागला.

त्यामुळे तिच्या उपचारासाठी निलंबन काळातील अर्धा पगार द्यावा, असा अर्ज २६ मार्च रोजी मुख्याधिकारी बबन तडवी यांच्याकडे दीपक राऊत यांनी दिला होता. तरीही त्यांना अर्धे वेतन मिळाले नाही. वैष्णवीच्या पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे तिला २ एप्रिल रोजी रात्री जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

३ एप्रिल रोजी वैष्णवीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती कोमात गेली. ७ एप्रिल रोजी पहाटे वैष्णवीचा मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्याजवळ पैसे नव्हते म्हणून आपली मुलगी गेली, या अपराधी भावनेतून दीपक राऊत हे अस्वस्थ झाले होते. याच अपराधी भावनेतून त्यांनी रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व नागरिक हादरून गेले. संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांनी दीपक राऊत यांचा मृतदेह नगर पंचायतीच्या दारात आणून ठेवला.
राऊत यांचे वेतन थांबवून त्यांना आर्थिक अडचणीत आणणाऱ्या मुख्याधिकारी बबन तडवी यांच्यावर गुन्हा दाखल करावा व दीपकच्या पत्नीला शासकीय नोकरी द्या, या मागणीसाठी नातेवाइकांनी आक्रोश आंदोलन सुरू केले.
दरम्यान, . नगरपंचायतचे कुठलेही कर्मचारी अधिकारी जर लवकर हजर नाही झाले तर नगरपंचायत समोरच अंत्यसंस्कार करू अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. काही तासातच बाप लेकीच्या एकापाठोपाठ मृत्यूने तालुका हळहळला आहे.