पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका, वनराज आंदेकर खुनातील आरोपीच्या भावाची हत्या, भर रस्त्यावर गाठलं अन्..


पुणे : शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्यातील बालाजीनगर परिसरात भरदिवसा झालेल्या हल्ल्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली असून गोळीबारात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी या घटनेला आंदेकर-कोमकर टोळी संघर्षाची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. टोळी युद्धातूनच हा खून झाल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

ही धक्कादायक घटना बालाजीनगर बस स्टँड परिसरात घडली. भर चौकात झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के असे असून तो जागीच ठार झाला. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. तपासादरम्यान मयत अक्षय म्हस्केचा भाऊ हा वनराज आंदेकर हत्याकांडातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आंदेकर टोळीशी संबंधित सूडातून हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर घडलेली ही चौथी हत्या असल्याने पुण्यातील वाढत्या टोळी युद्धावरून पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सलग घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!