इंदापूर तालुक्यातील सणसरच्या शेतकऱ्याची २०० कोटीच्या अमिषाने १ कोटी १३ लाखांची फसवणूक, नेमकं प्रकरण काय.?

बारामती : आमच्याकडे २०० ते २५० वर्षांपूर्वीचे कासेचे भांडे असून ते इस्रो किंवा नासा सारख्या ठिकाणी परग्रहावर पाठवणाऱ्या यानामध्ये लागते, त्याच्या विक्रीतून तब्बल २०० कोटी रुपये मिळवून देतो असे अमिष दाखवून इंदापूर तालुक्यातील सणसर मधील युवा शेतकऱ्याची तब्बल एक कोटी तेरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील राजेंद्र बाबुराव शेलार यांनी फिर्याद दिली असून त्या फिर्यादीवरून पोलिसांनी रफिक इस्माईल तांबोळी (राहणार लोहगाव पुणे) शिराज शेख पानसरे (राहणार कोंढवा पुणे) उमेश उमापुरे (राहणार कासार शिरशी तालुका निलंगा जिल्हा लातूर) व धनाजी पाटील (रा. सांगली) या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, २०१४ ते २०१८ या कालावधीत रफिक इस्माईल तांबोळी, शिराज शेख, उमेश उमापुरे व धनाजी पाटील यांनी वादग्रस्त जमिनी क्लियर करून आलेल्या पैशातून तुम्हाला मोबदला देतो असे सांगत दोनशे ते अडीचशे वर्षांचे जुने कासेचे भांडे घेऊन त्याच्या विक्रीतून २०० कोटी रुपये मिळवून देतो असे अमिष दाखवले.
त्यानंतर वरील चौघांनी बारामती शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बँकेत असलेले एक कोटी तेरा लाख रुपये घेतले. कासेचे भांडे विकले, पण दोनशे कोटी रुपये दिले नाहीत व एक कोटी तेरा लाख रुपये ही परत केले नाहीत यावरून राजेंद्र शेलार यांनी ही फिर्याद दिली आहे.