पुण्यात माजी मंत्र्याचे घर चोरट्यांच्या निशाण्यावर! विमाननगरमधील फ्लॅटमधून लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात चोरीची घटना घडली आहे. माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या राहत्या घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून महागड्या वस्तूंसह सुमारे ९० हजार ९१६ रुपयांचा ऐवज चोरून नेला. आमदारांच्याच घरात चोरी झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
पत्नीच्या लक्षात आला चोरीचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्राजक्त तनपुरे यांची पुण्यातील विमाननगर येथील ‘लुंकड स्काय व्हिला’ सोसायटीमध्ये सदनिका आहे. या सदनिकेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. यामध्ये महागडी पर्स, इअरपॉड, सूट आणि लिप पेन्सिल यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत ९० हजार ९१६ रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. घरातील साहित्य विस्कटलेले दिसल्याने आणि महत्त्वाच्या वस्तू गायब असल्याचे लक्षात आल्याने चोरीचा प्रकार समोर आला.

पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
विमाननगरसारख्या परिसरातील सोसायटीत लोकप्रतिनिधीच्या घरातच चोरी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. परिसरातील तसेच सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत.
