मोठी बातमी! माजी मंत्र्याचा दोन मुलांसह भाजपमध्ये प्रवेश, कुणाला बसणार धक्का?

सांगली : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी आज आपल्या दोन मुलांसह थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांना याचा थेट राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अण्णासाहेब डांगे यांनी यापूर्वी राज्यात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. नंतरच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र रे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते.

मात्र आता पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये परतले आहेत. डांगे यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगलीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना या प्रवेशामुळे धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज अण्णासाहेब डांगे, त्यांचे सुपुत्र चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनी भाजपा प्रवेश केला. त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते देखील भाजपमध्ये दाखल झाले.
अण्णासाहेब डांगे यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भाजपमध्ये कार्य केले. १९९५ मध्ये ते ग्रामीण विकास मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री होते. महाविकास आघाडीच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ते फारसे सक्रिय नव्हते. आता पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करत त्यांनी पक्षाला सांगली जिल्ह्यात बळकटी दिली आहे.
