विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन, संग्राम जगताप यांना पितृ शोक..


अहिल्यानगर : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन टर्म सदस्य अरुण जगताप यांचे शुक्रवारी (ता.२) अल्पशा आजाराने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. ते ६७ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. ते अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते. अरुण जगताप यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या सारसनगर येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अरुण जगताप यांनी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष, अहमदनगर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आले. ते अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष होते. सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते.

त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले की, अरुणकाका हे कर्तृत्ववान, सर्वसामान्यांशी नाळ जुळवून घेणारे नेतृत्व होते. त्यांनी राजकारण, समाजकारण, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला. त्यांचे निधन म्हणजे नगर जिल्ह्याची मोठी हानी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!