मोठी बातमी! गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचा विमान अपघातात मृत्यू, खासदाराकडून अधिकृत माहिती…

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद हवाई अड्ड्या जवळ आज, गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक मोठा विमान अपघात घडला आहे. अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टीजवळून उड्डाण घेताना एक प्रवासी विमान कोसळले.
या विमानात २४२ प्रवासी होते, आणि ते लंडनकडे निघाले होते. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेते विजय रुपानी यांचा देखील मृत्यू झाला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार परिमल नाथवाणी यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, अधिकृतरित्या अजून घोषणा झालेली नाही. परंतु, भाजप खासदारांनी यासंदर्भात माहिती दिल्याने त्याला पुष्टी मिळाली आहे.
विमानतळावर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अग्निशमन दल आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहेत. एअर इंडियाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात एकूण १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वैमानिकांसह २५ प्रवासी समाविष्ट आहेत. दुर्घटनास्थळी मदत कार्यासाठी वडोदऱ्यातून २५ अग्निशमन कर्मचारी आणि २०० बचाव कर्मचारी अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
या विमानात एकूण ५३ ब्रिटिश नागरिक होते, आणि दुर्घटनेनंतर ब्रिटन सरकारने या नागरिकांना तत्काळ कॉन्सुलर मदत पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून, ब्रिटिश प्रशासन भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रशासन या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले आहे.