१५ वर्षांच्या लेकीचं सोशल मीडिया अकाऊंट तपासलं; धक्कादायक मेसेजेस पाहून आईची थेट पोलिसांत धाव..


पुणे : आईच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय मुलीवर ओढवणारा मोठा अनर्थ टळला आहे. सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणाकडून छळ आणि अपहरणाच्या धमक्या दिल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अयान नसीम अहमद मलिक (वय १९, मूळ उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो खराडी परिसरातील एका सलूनमध्ये काम करत होता. सुमारे पाच महिन्यांपूर्वी त्याची पीडित मुलीशी सोशल मीडियावरून ओळख झाली होती.

सुरुवातीला मैत्री असलेले हे नाते पुढे छळात बदलले. आरोपी वारंवार मुलीचा पाठलाग करू लागला. एका प्रसंगी त्याने मुलीचा हात पकडत “माझ्यासोबत चल, नाहीतर तुला पळवून नेईन,” अशी धमकी दिली. तसेच तिच्या कुटुंबीयांनाही इजा करण्याची भाषा वापरली.

या घटनेमुळे मुलगी भीतीच्या छायेत होती. तिच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्याने आईने तिला विश्वासात घेतले आणि तिचे सोशल मीडिया अकाऊंट तपासले. त्यात आरोपीकडून पाठवलेले धमकीचे मेसेजेस पाहून आई हादरली.

यानंतर तिने तात्काळ खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!