रुग्णालयात उपचारांऐवजी तंत्र-मंत्राचा खेळ; खड्डा खोदताच समोर आलं धक्कादायक वास्तव

मुरादाबाद : रुग्णालयाच्या जमिनीतून सोने काढण्याचे आमिष दाखवत रुग्णालयाच्या संचालकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकबारा परिसरातील भादली गावात मुनशाद नावाच्या व्यक्तीचे एचएनपी नावाचे खासगी रुग्णालय होते. हे रुग्णालय मागील दोन वर्षांपासून बंद होते.
पाच महिन्यांपूर्वी मुनशादची झुबेर याच्याशी ओळख झाली. झुबेरने तांत्रिक पद्धतींनी त्याच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देत सुरुवातीला 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर दुसऱ्या भेटीत झुबेरने याकूब, निझामुद्दीन, शहजाद आणि शाहिद यांना सोबत आणत मुनशादला अधिक विश्वासात घेतले.

बुधवारी रात्री आरोपींनी मुनशादला त्याच्या बंद रुग्णालयात नेले. तेथे तंत्र-मंत्रासाठी साहित्य आणून एक खड्डा खोदण्यात आला आणि काही विधी सुरू करण्यात आले. त्यानंतर जमिनीत सोने असल्याचे सांगत ते काढण्यासाठी आणखी 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

मात्र मुनशादला संशय आल्याने त्याने आधी सोने काढून दाखवण्याची मागणी केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. खड्डा खोदून पाहिल्यानंतर सोन्याऐवजी चॉकलेट्स आढळल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
यानंतर मुनशादने आपले 15 हजार रुपये परत मागितले, मात्र आरोपींनी नकार दिल्याने दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.