आंबेनळी घाटातील मृत्यूचा काळा रविवार! १२०० फूट दरीत कोसळली स्कॉर्पिओ; साताऱ्यातील एकाच रस्त्यावरच्या पाच तरुणांचा अंत

सातारा : रविवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनने सातारा जिल्ह्यातील आसगाव गाव कायमचं सुन्न झालं. काही क्षणांपूर्वी हसत-खेळत प्रवासाला निघालेले गावातील तरुण आता कधीच परतणार नाहीत, ही बातमी गावात पोहोचताच एकच आक्रोश उसळला. महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचे अश्रू आणि प्रत्येक घरासमोर जमलेली गर्दी… आंबेनळी घाटातील भीषण अपघाताने संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी तब्बल १२०० फूट खोल दरीत कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांपैकी पाच जण हे सातारा तालुक्यातील आसगाव गावातील असून, विशेष म्हणजे हे सर्व एकाच रस्त्यावर राहणारे मित्र होते. त्यामुळे गावात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की, गाडीत असलेल्या आठही जणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेत महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (२५) आणि संदीप काटकर (३५) यांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी पाच जण आसगाव, दोन जण मर्ढे तर एक जण खटाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर रात्री दोन वाजल्यापासून बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, काळोख, खोल दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मदतकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकांच्या मदतीने दोरीला स्ट्रेचर बांधून एक-एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या भीषण दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. घाटरस्त्यावर संरक्षण कठडे नसल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शासनाच्या निष्काळजीपणामुळे आठ निष्पाप जीव गेल्याची भावना व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. आंबेनळी घाटातील या दुर्घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे.