वैद्यकीय उपचारात साडेपाच तासांचा विलंब; डोकाडिया कुटुंब मृत्यू प्रकरणात नवी माहिती, पोस्टमार्टममधून काय उघड?


मुंबई : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात नेमकं कारण काय, याचा तपास सुरू असताना उपचारात झालेल्या विलंबाचा महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. वैद्यकीय आणि फोरेन्सिक तज्ज्ञांच्या चर्चेतून सुमारे साडेपाच तास उपचार मिळण्यात उशीर झाल्याची बाब पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना पोटदुखी, उलट्या आणि अतिसाराची लक्षणे जाणवू लागली. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर काही काळ आराम मिळाला. मात्र, त्यानंतर प्रकृती पुन्हा बिघडली.

अशा परिस्थितीत तातडीने रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असताना काही काळ घरातच थांबल्याचे समोर आले आहे. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीय उपचारांमध्ये ‘गोल्डन अवर’ अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णांची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शवविच्छेदनातून घेतलेल्या नमुन्यांच्या प्राथमिक अहवालात तीव्र विषबाधेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कलिंगडामुळे विषबाधा झाली का, याचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे. तसेच ‘मॉर्फिन’सारख्या घातक पदार्थाचा संशयही व्यक्त केला जात असून अंतिम निष्कर्ष विषशास्त्र अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!