अखेर मुहूर्त ठरला! बीड ते अहिल्यानगर रेल्वे ‘या’ तारखेपासून धावणार, जाणून घ्या कसा असेल मार्ग ..

बीड : बीड आणि अहिल्यानगरवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बीड ते अहिल्यानगर मार्गावर लवकरच रेल्वे धावणार आहे. रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी, म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीचा शुभारंभ होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याचा निर्णय घेण्यात आला.
अनेक दशकांपासून रेल्वेसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांसाठी ही मोठी आनंदवार्ता आहे. या मार्गामुळे प्रवास सोयीस्कर होणार असून, बीड जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले की, बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करून काम गतीने पूर्ण केले जाईल. भूसंपादनाची प्रकरणे जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडवावी आणि आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, राज्य सरकारचा हिस्सा असलेले निधी तातडीने देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

याचबरोबर फलटण-लोणंद मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बारामती स्थानकावरील कामे जलदगतीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध कराव्यात, असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले.
असा असेल रेल्वे मार्ग..
एकूण लांबी: २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे भूसंपादन: १८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील पूल: १३०, रेल्वेवरील पूल: ६५, मोठे पूल: ६५, छोटे पूल: ३०२, एकूण प्रकल्प किंमत: ₹४८०५.१७ कोटी, केंद्र व राज्य शासनाचा हिस्सा: प्रत्येकी ₹२४०२.५९ कोटी (५०:५० प्रमाणात)