मोठी बातमी! शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल मिळणार; मात्र शासनाने घातल्या नव्या अटी, नियमांचे पालन बंधनकारक


मुंबई : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कॅनमध्ये डिझेल देण्यावर घालण्यात आलेली बंदी जिल्हा प्रशासनाने अखेर मागे घेतली आहे. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधानंतर प्रशासनाला हा निर्णय बदलावा लागला.

आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी पुन्हा कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. खरीप हंगामातील नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना अचानक लावण्यात आलेल्या बंदीमुळे अनेक शेतकरी अडचणीत आले होते.

कॅनमध्ये डिझेल न मिळाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर न्यावे लागत होते. अनेक गावांपासून पेट्रोल पंप दूर असल्याने अतिरिक्त वेळ, इंधन आणि मजुरीचा खर्च वाढत होता. त्यामुळे शेतीकामांवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होत्या.

बंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. ज्यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर नव्हते किंवा शेतापर्यंत डिझेल पोहोचवण्याची सुविधा नव्हती, त्यांच्या शेतीची कामे ठप्प झाली होती.

शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेत प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत निर्णय मागे घेत पुन्हा कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील कामांना आता वेग मिळणार असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. डिझेल घेण्यासाठी ट्रॅक्टरचे आरसी बुक, अॅग्रीस्टॅक आयडी, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!