शेतकऱ्यांनो सावधान! पेरणीची घाई नको; कृषी विभागासह फडणवीसांचे मोठे आवाहन


मुंबई : भारतीय हवामान विभागाने 15 जूनपर्यंत राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, मॉन्सूनची वाटचाल मंदावल्याने तो अद्याप अरबी समुद्रातच रेंगाळलेला आहे. हवामानातील बदल आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मॉन्सूनच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी नांगरणीसह पेरणीपूर्व तयारी पूर्ण केली असून बियाणे व खतेही खरेदी करून ठेवली आहेत.

दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. हवामानाची स्थिती लक्षात घेऊन योग्य वेळीच पेरणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

अरबी समुद्रात थांबलेल्या मॉन्सूनची पुढील 3 ते 4 दिवसांत प्रगती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी राज्यभर समाधानकारक पाऊस कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पेरणीचा हंगाम जवळ आला असताना पावसाचा विलंब आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!