आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढ जाहीर, राज्यात ४७ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित, जाणून घ्या…

पुणे : प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यामध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
यामुळे याकडे विद्यार्थ्यांकडे लक्ष लागले आहे. पात्र विद्यार्थ्यांचे आता 1 ते 10 मार्चदरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहेत. शुक्रवारी सायंकाळपर्यंत 47 हजार 559 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यंदा राज्यातील 8 हजार 853 शाळांमधील 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
यामध्ये 3 लाख 5 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र यानंतर देखील मुदतवाढ करण्याची मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. यामध्ये आता प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या निवासी पत्त्याच्या पुराव्याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. यामुळे हे देखील महत्वाचे आहे. यामध्ये स्वतःच्या मालकीची निवासव्यवस्था असलेल्या पालकांना शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना द्यावा लागणार आहे.
तसेच वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तसेच स्वत:च्या मालकीची निवासव्यवस्था नसलेल्या पालकांना ते ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहेत, त्या क्षेत्रातील निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य असेल. पुण्यात 6 हजार प्रवेश निश्चित झाले आहेत.