बारामतीत प्रचाराच्या सांगता सभेचा ‘गेम’ बदलला! सुनेत्रा पवार यांचा स्मार्ट डाव, विजयाची स्पष्ट रणनीती…

बारामती : बारामतीच्या राजकारणात वर्षानुवर्षे ‘सांगता सभा = मिशन हायस्कूल’ हेच समीकरण मानले जात होते. मात्र, यंदाच्या पोटनिवडणुकीत हे चित्र बदलताना दिसत आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता पारंपरिक ठिकाणी न करता थेट ‘विजयी सभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारदा प्रांगणातून करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

या निर्णयातून ‘लढाई नाहीच, थेट विजय’ असा आत्मविश्वासपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. बारामतीच्या राजकारणात पवार कुटुंबासाठी ‘मिशन हायस्कूल’ हे वर्षानुवर्षे पॉवर सेंटर मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर या ठिकाणाला वेगळी राजकीय ओळख मिळाली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी मिशन हायस्कूलवर सांगता सभा घेऊन आपली ताकद दाखवली होती. तर दुसरीकडे शरद पवार यांनी लेंडीपट्टी मैदानावर सभा घेत स्वतंत्र राजकीय भूमिका मांडली होती. त्यामुळे बारामतीत दोन वेगवेगळ्या ‘राजकीय मंचां’वरून शक्तिपरीक्षण होत असल्याचे चित्र दिसत होते.

मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक आणि राजकीय पोकळीत आता सुनेत्रा पवार यांनी तिसरा मार्ग स्वीकारला आहे. मिशन हायस्कूलऐवजी शारदा प्रांगणाची निवड करून त्यांनी प्रचाराचा वेगळाच पॅटर्न राबवला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, शारदा प्रांगण हे ‘विजय सभेचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा याच ठिकाणी घेण्यामागे मतदारांच्या मनात आधीच विजयाची भावना निर्माण करण्याची रणनीती असल्याचे मानले जात आहे.
या निर्णयातून अजित पवार यांच्या पारंपरिक राजकीय छायेतून बाहेर पडत ‘नवीन नेतृत्व’ पुढे येत असल्याचे संकेत दिले जात आहेत. तसेच, निवडणुकीचा शेवट हा संघर्षाचा नसून विजयाचा असेल, असा ठाम आत्मविश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, उद्या मंगळवारी (२१ एप्रिल) होणाऱ्या या सांगता सभेला देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.