इंदापूरात ‘जमिनीचा सौदा’ ठरला गुन्ह्यांचा सापळा! लाखोंची फसवणूक, अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; तिघांवर पोक्सो-अॅट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे


इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जमिनीच्या व्यवहारातून सुरू झालेला वाद आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे लाखो रुपयांची फसवणूक, जीवे मारण्याची धमकी, महिलेशी गैरवर्तन आणि अल्पवयीन मुलीशी कथित अश्लील वर्तन केल्याच्या आरोपांमुळे तिघांविरुद्ध पोक्सो कायदा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

या प्रकरणात सुभाष संभाजी डरंगे, शिवाजी दशरथ जगताप आणि दशरथ नामदेव आसबे (रा. बाबुळगाव, ता. इंदापूर) यांच्याविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक 454/2026 नुसार 27 जुलै रोजी रात्री हा गुन्हा नोंदविण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची जबाबदारी उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) चैतन्य कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

फिर्यादीनुसार, मार्च 2026 मध्ये आरोपींनी संबंधित जमिनीचा मालकी हक्क नसतानाही ती विक्रीस असल्याचे भासवून फिर्यादी कुटुंबाशी व्यवहार केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वास संपादन करून लाखो रुपयांची रक्कम स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यवहारानंतर उर्वरित रक्कम आणि कागदपत्रांबाबत विचारणा करण्यात आली असता, आरोपींकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाला अधिक गंभीर वळण 8 जुलै रोजी घडलेल्या कथित घटनेमुळे मिळाले. फिर्यादीचे पती आणि मुलगा घराबाहेर असताना आरोपी घरात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी घरात असलेल्या अल्पवयीन मुलीशी वाद घालत तिचा हात पकडून विनयभंग व गैरवर्तन करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांच्या आधारे पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदविला आहे.

तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही विविध कलमे लावण्यात आली आहेत. फिर्यादीने सामाजिक अपमान आणि धमकी दिल्याचाही आरोप केला असून, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 74, 351(2), 3(5) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 8 व 12 आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) व 3(1)(w)(i) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांकडून संबंधित व्यवहारातील कागदपत्रे, आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे आणि फिर्यादीने केलेल्या आरोपांची सखोल पडताळणी सुरू आहे. आरोपींची भूमिका, व्यवहारातील इतर संबंधित व्यक्तींचा सहभाग आणि कथित बनावट कागदपत्रांचा उगम याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!