बीडमध्ये ईदआधी मशिदीत स्फोट, पोलिसांनी दोन जणांना घेतले ताब्यात, समोर आली मोठी अपडेट..

बीड : मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. अलीकडेच बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आलीय. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
आता पुन्हा एका बीडला हादरवणारी घटना समोर आली आहे. शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास बीडच्या अर्धामसला गावात मशिदीत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ऐन रमझानमध्ये मशिदीत अशाप्रकारे स्फोट घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुढीपाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असताना बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फ़ोट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झालं.
एका माथेफिरूने हा स्फोट घडवल्याची माहिती समोर आली आहे.मात्र हा स्फोट घडवण्यामागे आरोपीचा काय हेतू होता. त्याच्याकडे ही स्फोटकं कुठून आली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली. मात्र आता या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
दरम्यान रात्री अडीचच्या सुमारास हा स्फोट झाल्याने मशिदीत लोकांची वर्दळ न्हवती,त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एका धार्मिक स्थळात हा स्फोट घडल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे घटनास्थळी पोलिसांकडून शांततेच आवाहन केले जात आहे.