घरी पत्नी असतानाही दुसऱ्या प्रेमात पडला! चूक लक्षात आली पण वेळ निघून गेली; पुण्यात तरुणाचा धक्कादायक शेवट

पुणे : उत्तमनगर परिसरात एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी आणि तिच्या मित्राकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला आणि तिच्या मित्राविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शरद दामोदर ससाणे असे मृत तरुणाचे नाव असून ते विवाहित होते.
माहितीनुसार, शरद यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संबंधित महिला आणि तिचा मित्र परमेश्वर उर्फ प्रमोद बाळू गायकवाड (रा. नऱ्हे) हे दोघे मिळून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे.

या त्रासाला कंटाळून शरद यांनी १३ एप्रिल रोजी रात्री एनडीए गेट क्रमांक १० परिसरात विष प्राशन केल्याचे समोर आले आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर शरद यांच्या पत्नीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पतीच्या मृत्यूस संबंधित महिला नम्रता किरण खंदारे आणि तिचा मित्र जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.