मद्यधुंद प्रवाशाकडून विमानात एअर होस्टेसचा विनयभंग, दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श केला अन्…

शिर्डी : दिल्लीहून शिर्डीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डी विमानतळावर विमान उतरताच प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील आहे. शुक्रवारी २ मे रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटे ते ४ वाजून १० मिनिटांच्या दरम्यान दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या प्रवासादरम्यान आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसला दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर शिर्डी विमानतळ इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे रा. लोणी यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड चुरू, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४ (विनयभंग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे करत आहेत. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.