वडिलांचा फोन घेण्यासाठी कार थांबवली… अन् क्षणात घडला थरार! मद्यधुंद चालकाच्या रिव्हर्सने स्विफ्टचा चुराडा…

लोणी काळभोर : पुणे–सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोलनाक्याजवळ पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका बेदरकार अपघाताने वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वडिलांचा फोन आल्याने कार पार्क करून बाहेर उतरलेल्या आयटी अभियंत्याच्या वाहनाला शेजारी उभ्या असलेल्या कारच्या चालकाने भरधाव रिव्हर्स घेत जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदरा मंदिर रोड, लोणी काळभोर येथील रहिवासी रोहण बळीराम पवार (वय २८) हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. १ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ते हडपसर येथून आपल्या घरी परतत होते. पहाटे सुमारे २.१५ वाजण्याच्या सुमारास वडिलांचा फोन आल्याने त्यांनी कवडीपाट येथील हिरा लॉजजवळील पार्किंगमध्ये आपली मारुती सुझुकी स्विफ्ट (क्रमांक HP-12-E-9021) उभी केली. फोनवर निवांत बोलण्यासाठी ते कारबाहेर आले होते.

दरम्यान, शेजारी पार्क केलेल्या हुंडाई आय-२० (क्रमांक MH-12-KE-1876) या कारच्या चालकाने अचानक वेगाने रिव्हर्स घेतली. मागे कोणते वाहन उभे आहे किंवा परिसरात कोणी व्यक्ती आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता घेतलेल्या रिव्हर्समुळे कार थेट स्विफ्टच्या डाव्या बाजूवर आदळली. धडकेमुळे स्विफ्टचा दरवाजा, फेंडर आणि बाजूचा भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला. धडकेचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले.


अपघातानंतर संबंधित चालकाने स्वतःचे नाव ‘विलास’ असल्याचे सांगितले. मात्र त्याच्याशी संवाद साधताना तो मद्याच्या नशेत असल्याचा संशय आल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे चालकाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, पोलिसांकडून त्यासंदर्भातील तपास सुरू करण्यात आला आहे.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने फिर्यादीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे संबंधित चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास सुरू असून, चालकाने मद्यप्राशन केले होते का याचीही पडताळणी केली जात आहे.
महामार्गालगतच्या पार्किंगमध्ये वाहन उभी करताना तसेच रिव्हर्स घेताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास मोठे अपघात होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.