कोल्हापूर गॅझेटवरून सरकारला थेट इशारा; ८ दिवसांचा अल्टिमेटम, मराठा आरक्षणावर पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे

कोल्हापूर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूर दौऱ्यात राज्य सरकारला पुन्हा एकदा तीव्र आणि स्पष्ट इशारा दिला आहे. कोल्हापुरात अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी शाहू महाराजांची नवीन राजवाड्यात भेट घेतली. या भेटीत कोल्हापूर गॅझेट, मराठा समाजाच्या नोंदी आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, शाहू महाराजांच्या काळातील ऐतिहासिक नोंदींमध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. या नोंदींचा आधार घेऊन तातडीने पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. त्यांच्या मते, कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल दीड लाखांहून अधिक नोंदी उपलब्ध आहेत आणि त्याचा थेट फायदा गरजू मराठा कुटुंबांना मिळाला पाहिजे.
त्यांनी असा आरोप केला की, शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी असूनही त्यानुसार प्रमाणपत्र वाटप अतिशय कमी प्रमाणात झाले आहे. अनेक पात्र लाभार्थी अजूनही वंचित आहेत, हे मोठे अन्यायकारक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

विखे पाटील समितीनेही या नोंदी गांभीर्याने घेऊन कोल्हापूर गॅझेट अधिकृतपणे स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी केली. या नोंदींचा योग्य वापर केल्यास केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच लाखो मराठा समाजातील नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, असा दावा त्यांनी केला.

सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पुढील आठ दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
मराठा व कुणबी समाजासाठी स्वतंत्र व्यवस्था, तसेच महामंडळ मजबूत करून ते बंद पडू नये यासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
या घडामोडींमुळे कोल्हापूर दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.