हा माणूस तर अत्यंत कृतघ्न निघाला, दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार…

पुणे : सध्या अजित पवार सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी खचून न जाता पुन्हा पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षफुटीनंतर या दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. शरद पवार यांच्या जवळचे असलेले पण अजित पवार यांच्याकडे गेलेले दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना त्यांना जनतेने एकदाही बहुमत देऊन मुख्यमंत्री केले नाही. आपले केवळ ६० ते ७० आमदार निवडून येतात. असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
त्यावरून आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये आव्हाड म्हणाले, सर्वात विश्वासू साथीदार आणि साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला.
वळसे-पाटलांची झालेली नैतिक अधोगती पाहून मला खूप वाईट वाटले. पवारांना या माणसातील हा गुण कसा समजला नाही. त्यांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे, असेही आव्हाड म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी शरद पवार गटाची साथ सोडली. विश्वासू आणि जवळचे सहकारी अजित पवार गटामध्ये गेल्याने शरद पवारांना खूप मोठा धक्का बसला होता.