रोहित पवारांना शरद पवारांची ‘ही’ भूमिका खटकली? महत्त्वाच्या बैठीकडे पाठ फिरवल्याची चर्चा..


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये मोठ्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षातही अंतर्गत नाराजी उफाळल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज यशवंतराव चव्हाण सभागृहात महत्त्वाची बैठक होणार असली तरी या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते सध्या पुण्यात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीमागे नाराजीचं कारण आहे का? यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रोहित पवार यांच्या नाराजीमागे एक महत्त्वाचं कारण असल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांचं कौतुक करत त्यांना “क्षमतेचे नेते” म्हटलं होतं. त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर सध्याच्या नेतृत्वाने करायला हवा, असंही पवार यांनी म्हटलं होतं.

याच वक्तव्यामुळे रोहित पवार नाराज झाल्याची चर्चा आहे. कारण रोहित पवार हे सातत्याने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर टीका करत आले आहेत. अशातच शरद पवारांनी त्यांचं कौतुक केल्याने पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही पक्षांतील वाढत्या हालचाली आणि नाराजीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!