‘ती माझीच होती…’ म्हणत पीजीत घुसला; प्रियकरावर लोखंडी रॉडने १४ वार, तरुणीवरही जीवघेणा हल्ला
पिंपरी-चिंचवड : हिंजवडीतील एका पीजीमध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या रक्तरंजित हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. शालेय जीवनापासून प्रेमसंबंध असलेल्या तरुणीने दुसऱ्या तरुणासोबत नवे आयुष्य सुरू केल्याचा राग मनात धरून एक्स बॉयफ्रेण्डने थेट पीजीमध्ये प्रवेश केला आणि काही मिनिटांतच संपूर्ण परिसर रक्ताने माखला. लोखंडी रॉडने केलेल्या अमानुष हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या थरारक घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येमागील प्रत्येक पैलूचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एका सात मजली पीजीमध्ये सागर गायकवाड हा नुकताच व्यवस्थापक म्हणून रुजू झाला होता. बुधवारी रात्री निकिता शिवाजी दनाने ही तरुणी एका महिन्यासाठी तेथे राहण्यास आली. तिने पीजी व्यवस्थापनाला सागर हा आपला प्रियकर असल्याचे सांगितले. त्यानुसार तिला तिसऱ्या मजल्यावरील ३१० क्रमांकाची खोली देण्यात आली.

गुरुवारी दुपारी दिनेश महादेव झांबरे हा पीजीमध्ये आला. “निकिता माझी प्रेयसी आहे, मला सागरला भेटायचे आहे,” असे सांगत तो थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. काही क्षणांतच तिसऱ्या मजल्यावरून किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. कर्मचारी आणि रहिवासी धावत गेले असता सागर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला, तर आरोपी लोखंडी रॉडने त्याच्यावर सपासप वार करत होता.


प्रत्यक्षदर्शींनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या आरोपीने निकितालाही बेदम मारहाण करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सागरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमी निकितावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि निकिता यांचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढे दोघेही बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आले. शिक्षणादरम्यान निकिता आणि सागर यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने दिनेश संतप्त झाला होता. याच सूडाच्या भावनेतून त्याने हल्ल्याचा कट रचल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिस तपासात सागरच्या शरीरावर लोखंडी रॉडने १३ ते १४ वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना हिंजवडी पोलिसांनी वेगाने कारवाई करत त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खून, हत्येचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रेमसंबंधातील वाद इतक्या टोकाला कसा पोहोचला, आरोपीने हल्ल्याचे पूर्वनियोजन केले होते का, तसेच या प्रकरणामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पीजीसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे हिंजवडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.