दौंडमध्ये दुधात भेसळ की केमिकलचा खेळ? तापवल्यावर प्लास्टिकसारख्या गाठी; नागरिकांमध्ये संताप

दौंड : आजकाल बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कमी खर्चात जास्त नफा कमवण्याच्या नादात काही विक्रेते सर्रास भेसळ करताना दिसतायत. दूध, पनीर, तूप अशा दुग्धजन्य पदार्थांमध्ये तर भेसळीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्राहकांनीही आता अधिक जागरूक राहण्याची गरज आहे.

अशातच दौंड तालुक्यातील पाटस परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे विक्रीस असलेल्या दुधामध्ये भेसळ झाल्याचं उघड झालं असून संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाटस येथील युवराज आव्हाड यांनी स्थानिक स्वीट होममधून दूध खरेदी केलं होतं. घरी आणल्यानंतर त्यांनी ते दूध नेहमीप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवून दिलं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे काही वेळानंतर त्यांनी दूध तापवण्यासाठी गॅसवर ठेवलं. मात्र दूध तापवल्यानंतर जे काही दिसलं ते पाहून तेही चक्रावून गेले.

सुरुवातीला दूध फुटलं असावं असं वाटलं, पण नीट पाहिल्यावर दुधामध्ये चक्क प्लास्टिकसारखा चिकट पदार्थ तयार झाल्याचं दिसून आलं. मोठमोठ्या गाठी तयार झाल्या होत्या आणि त्या हाताने ओढल्यावर चिंगमसारख्या ताणल्या जात होत्या. हा प्रकार पाहून आव्हाड यांनी लगेचच शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांनीही हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं आणि “हे दूध नाय, काहीतरी केमिकलचं खेळ दिसतोय” अशी चर्चा सुरू झाली.

या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. “असं भेसळयुक्त दूध जर लोकांच्या पोटात जात असेल, तर आरोग्याचं काय होणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
महत्त्वाचं म्हणजे, या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन तपास करावा, नमुने तपासणीसाठी पाठवावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
“पैशाच्या हव्यासापायी लोकांच्या जिवाशी खेळ सुरू झालाय.” त्यामुळे नागरिकांनीही दूध किंवा इतर अन्नपदार्थ घेताना काळजी घ्यावी, संशयास्पद वाटल्यास तात्काळ संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असं आवाहन करण्यात येत आहे.