Crime News : दोघांनी बिर्याणी बनवली, पण चव बिघडली, डोक्यात सिलिंडरची टाकी घालून मित्राला संपवलं, पुण्यात धक्कादायक घटना…

Crime News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

एकत्र राहणाऱ्या दोन मित्रांनी घरी बिर्याणी करायचा प्लॅन केला. मात्र, या प्लॅनमुळे मित्राला आपला जीव गमवावा लागला आहे. बिर्याणी चांगली झाली नाही, असे सांगितल्याने चिडलेल्या मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात सिलिंडरची टाकी घालून खून केला. ही घटना दिघी येथे रविवारी (ता.१५) दुपारी घडली आहे.
संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. दिघी रोड, मूळ रा. वाशिम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे (रा. दिघी, मूळ रा. वाशिम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी बद्री विठ्ठल चव्हाण (वय ३५) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे तीन महिन्यांपूर्वी कामानिमित्त गावावरून दिघी येथे राहण्यास आले होते. संतोष आणि आरोपी गणेश खंडारे दोघेही बांधकाम साइटवर मिस्त्रीचे काम करीत होते. रविवारी त्यांनी बिर्याणी बनवण्याचा बेत आखला होता.
आरोपी गणेश याने बिर्याणी बनवली. मात्र ती चांगली झाली नाही, असे म्हणत मयत खंदारे यांनी खंडारे याच्याशी वाद घातला. त्यावरून दोघांच्यात हाणामारी झाली. यावेळी खंडारे याने खंदारे यांच्या डोक्यात गॅस सिलिंडरची टाकी घातली.
दरम्यान, यामध्ये खंदारे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे तपास करीत आहेत. या घटनेनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
