पुणे जिल्ह्यातील ४५ शाळांवर कारवाईचा बडगा; जिल्हा परिषदेकडून अनधिकृत शाळांची यादी जाहीर, तुमच्या परिसरातील शाळा आहे का?

पुणे : पुणे जिल्ह्यातील पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून तब्बल ४५ शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळा शासनाची अंतिम मान्यता न घेता सुरू असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

शिक्षण विभागाने पालकांना सावध राहण्याचे आवाहन करत प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची अधिकृत मान्यता तपासून घ्यावी, असे सांगितले आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, काही शाळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रवेशासाठी जाहिराती केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात त्या शाळांना शासनाची अंतिम परवानगी नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि हवेली परिसरातील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर ही माहिती पुढे आली.

माहितीनुसार, पुणे महापालिका हद्दीत १२ शाळा अनधिकृत आढळल्या आहेत. त्यापैकी काहींना केवळ इरादा पत्र मिळाले असून अंतिम मान्यता अद्याप देण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातही ९ शाळा विनापरवाना सुरू असल्याचे समोर आले आहे. शासनाच्या आदेशानुसार काही प्रकरणांमध्ये गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात २४ शाळांबाबत अनियमितता आढळून आली आहे. काही शाळांना मान्यता नसताना त्या सुरू आहेत, तर काही शाळांनी मंजूर ठिकाणाऐवजी दुसऱ्याच ठिकाणी स्थलांतर करून वर्ग सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची नावे पुढीलप्रमाणे…
सेंट झेव्हिअर्स स्कूल (भोर), ओरिजनल मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल (सोरतापवाडी, हवेली), न्यू लिफ इंग्लिश मीडियम स्कूल (सरडेवाडी, इंदापूर), ईरा पब्लिक स्कूल (इंदापूर), अहिल्या इंग्लिश मीडियम स्कूल (काझड, इंदापूर), जयश्री इंग्लिश मीडियम स्कूल (ठाकूरवस्ती, सोळू, खेड), ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल (मरकळ, खेड), ज्ञानज्योत इंग्लिश मीडियम स्कूल (पद्मावती रस्ता, आळंदी, खेड), छत्रपती शिवाजी राजे विद्यालय (आळंदी केळगाव रोड, खेड), हम्पी-डम्पी प्री स्कूल देव कृपा मॉल (वाडा रोड, खेड), सरस्वती विद्यालय (आळंदी केळगाव रोड, खेड), जीझस क्राइस्ट इंग्लिश मीडियम स्कूल (कामशेत, मावळ), सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल (नवलाख उंबरे, मावळ), एंजल हाय (दत्तवाडी नेरे, मुळशी), क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल (जांबे, खेड), श्री श्री रवीशंकर विद्यामंदिर (भूगाव, मुळशी), चाणक्य ज्युनिअर कॉलेज, पिरंगुट (मुळशी), सरस्वी क्लासेस (पिरंगुट, मुळशी), एटिट इंटरनॅशनल स्कूल (कासार आंबोली, मुळशी), पेरीविकल इंग्लिश मीडियम School (पिरंगुट, मुळशी), श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर, पुरंदर) आणि सेंट चावरा स्कूल (सरदवाडी, शिरूर).