देशात काँग्रेस करणार आज सर्व जिल्हा मुख्यालयावर एकदिवसीय सत्याग्रह ! राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मुद्दा !!

नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या संसदेतील सदस्यत्व समाप्तीचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने शनिवारी देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली असतानाच, रविवारी दिल्लीतील महात्मा गांधी यांची समाधी राजघाट आणि सर्व जिल्हा मुख्यालयांवर एकदिवसीय सत्याग्रह करण्याची घोषणा केली आहे.
केरळमधील वायनाडमध्ये पक्षाने शनिवार हा काळा दिवस म्हणून पाळला. अनेक शहरांमध्ये रस्ते अडवण्यात आले आणि निदर्शने करण्यात आली.
खरगे, प्रियांकाने स्वीकारली जबाबदारी
पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियंका वाड्रा यांनी या आंदोलनाला धार देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघेही राजघाटावरील धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
रविवारी जिल्हा मुख्यालयातील गांधी पुतळ्यासमोर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सत्याग्रह करण्याचे निर्देश राज्य घटकांना देण्यात आले आहेत. त्याला संकल्प सत्याग्रह असे नाव देण्यात आले आहे.