राजस्थानच्या पंचायत निवडणुकीत काँग्रेसची मोठी मुसंडी! राहुल गांधींची खास पोस्ट; भाजपवर साधला निशाणा

नवी दिल्ली : राजस्थानमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपला ग्रामीण भागात अपेक्षित यश मिळवता आले नाही. काँग्रेसच्या या कामगिरीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत ग्रामीण भागातील मतदारांचे आभार मानले आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, राजस्थानमधील ग्रामीण भागातील बंधू-भगिनींनी पंचायत निवडणुकीत काँग्रेसवर जो विश्वास दाखवला आहे, ती आता आमची जबाबदारी आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातूनच हा कौल आला असून, तो थेट ‘डबल इंजिन’ सरकारला दिलेला संदेश आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपवर राहुल गांधींचे गंभीर आरोप

राहुल गांधी यांनी भाजपवर मनरेगा योजनेवर हल्ला केल्याचा, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीत ढकलल्याचा आणि पंचायतींचे अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केला. महागाई, बेरोजगारी आणि स्थलांतरामुळे गावांमधील परिस्थिती बदलली असल्याचेही त्यांनी म्हटले.

‘गावं सर्व काही पाहत होती, सहन करत होती. आता त्यांनी आपला आवाज बुलंद केला आहे. हा केवळ राजस्थानचा जनादेश नाही, तर देशातील प्रत्येक गावाचा आवाज आहे,’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली.
जयपूरमध्ये काँग्रेसची मोठी कामगिरी
राजधानी जयपूरमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. जयपूर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांपैकी काँग्रेसने ४१ जागांवर विजय मिळवला, तर भाजपला १२ जागांवर समाधान मानावे लागले. तसेच जयपूरमधील २२ पंचायत समित्यांपैकी १४ ठिकाणी काँग्रेसने बहुमत मिळवले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सांगानेर मतदारसंघात हनुमान बेनीवाल यांच्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने (RLP) बहुमत मिळवले आहे. त्यामुळे राजस्थानमधील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.
