पुण्यात आयुक्तांचा दणका ; दोन सहाय्यक आयुक्तांची थेट उचलबांगडी अन तीन अधिकारी निलंबित..

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी निवडणूकीआधी शहरातील नागरी सुविधा बाबत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.परिसरातील गंभीर असुविधा पाहून संतप्त महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई केली ज्यात वाघोली, शेवाळवाडी, मांजरी भागातील सहाय्यक आयुक्तांसह तीन उपअभियंते बदली करण्यात आली असून तर तीन अधिकाऱ्यांना थेट निलंबनाचे आदेश दिलेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतीच पुण्यातील शेवाळवाडी आणि मांजरी , वाघोली या परिसराची पाहणी केली. त्याच दरम्यान वाघोलीमध्ये नागरिकांनी आयुक्ताना भेटून थेट महापालिकेच्या खराब स्थितीचा जाब बिचारला. त्यानंतर नागरिकांच्या समस्या ऐकून आणि प्रत्यक्षात पाहणी केली असता आयुक्त नवल किशोर राम संतप्त झाले आणि त्यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. पाहणी दरम्यान अस्वच्छता, रस्त्यांवरील खड्डे, सांडपाण्याचा प्रवाह आणि अतिक्रमण या समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना झाला. या निष्क्रियतेमुळे हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे-पाटील यांची तडकाफडकी बदली केली गेली आहे. तसेच मलनिःसारण विभागाचे शाखा अभियंता, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आरोग्य निरीक्षक आणि मुकादम व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांना निलंबित केले आहे.

दरम्यान महापालिकेच्या कामकाजातील निष्काळजीपणा आता सहन केला जाणार नाही, नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना महापालिकेत स्थान मिळणार नाही. खात्यांतर्गत चौकशीनंतर अधिकाऱ्यांची अकार्यकारी पदावर बदली आणि निलंबनाची कारवाई केली जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

