रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील रामोशी व बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही हे लक्षात घेवून शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले.
पुरंदर तालुक्यात भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला.
यावेळी आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, माजी आमदार अशोक टेकवडे तसेच दौलतनाना शितोळे, बाबासाहेब जाधवराव, जालिंदर कामठे, अंकुशराव जाधव आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रामोशी व बेरड असा उल्लेख करून त्याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या माध्यमातून समाजातील युवकांना सक्षम करण्याचे काम करण्यात येईल.
शिक्षण,आरोग्य आणि रोजगाराच्या संधी रामोशी समाजाला मिळण्यासाठी शासन प्रयत्न करेल. आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रस्ताव तयार झाला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. रामोशी आणि बेरड समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस पुढे म्हणाले, भटक्या आणि विमुक्त जातीतील १० ऐवजी ५० विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समाजातील बेघर नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे.
दहावी नंतर व्यवसायिक शिक्षण घेता यावे यासाठी वसतिगृहे उभारण्यात येत असून, याचा फायदाही रामोशी आणि बेरड समाजातील विद्यार्थ्यांना होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.