कोथरूड मतदान संघातील वाहतूक कोंडीवर उपाय काढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट, मिसिंग लिंकसाठी निधीची मागणी…

पुणे : कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याबाबत रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. भेट घेऊन मिसिंग लिंकसाठी आवश्यक निधी देण्यासंदर्भात निवेदन दिले.

पुणे शहरातील रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडथळ्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटींची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटींचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे, असे त्यांना सांगितले. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना पुणे शहरातील रस्ते विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकारकडून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी महानगरपालिका देखील काही निधी उपलब्ध करणार आहे.
