घराबाहेर बोलवलं अन् प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने गळ्यावर केले १२ वार, घटनेने महाराष्ट्र हादरला..

नागपूर : गुन्हेगारीच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना नागपूर येथून समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटन उघडकीस आली आहे.
ही घटना नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपीनं आपल्या एका साथीदाराच्या मदतीने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने ११ ते १२ वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता, की प्रेयसीचा पती जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.
शेरा सूर्यप्रकाश मलिक असं हत्या झालेल्या ३३ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर गीतेश उर्फ रजत उके आणि भोजराज मोरेश्वर कुंभारे असं हत्या करणाऱ्या आरोपींची नावं आहेत.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बांगलादेश वस्तीत नाईक तलाव परिसरात ही घटना घडली आहे. हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पाचपावली पोलिसांनी काही तासातच अटक केली आहे. अनैतिक संबंधातून शेराची हत्या झाल्याचं प्राथमिक कारण तपासात समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गीतेश उके याचे शेरा मलिकच्या पत्नीसोबत गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. ही बाब शेराला समजल्यावर त्याने गीतेशला दूर राहण्याचा इशारा दिला. मात्र त्यावरून वाद वाढला आणि परस्पर धमक्या सुरू झाल्या. याच रागातून गीतेशने शेराची हत्या करण्याचा कट रचला.
दरम्यान, त्याने मित्र भोजराजला शेराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम दिलं. शेरा घरी असल्याची खबर मिळाल्यानंतर दोघेही त्याच्या घरी गेले आणि त्याला बाहेर बोलावलं. शेरा काही समजण्याच्या आतच गळ्यावर कोयत्याने अगदी जवळून एकामागोमाग एक १२ वार करण्यात आले. शेरा जागीच मृत झाला.
घटनेनंतर पाचपावली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांतच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.