महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ची कुजबुज; ठाकरे गटात खदखद उघड, 82 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. परभणीत तब्बल 82 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. या निर्णयाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात राजीनामे देण्यात आले. यामुळे ठाकरे गटातील संघटनात्मक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेने राजकारण अधिक तापले आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सूचक विधान करत, “योग्य वेळी एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर यशस्वी करतील. ठाकरे गटातील अनेक आमदार-खासदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य फूट आणि पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली. जरी हा दौरा वैयक्तिक कारणासाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याचे राजकीय अर्थ लावले जात आहेत.

परभणीतील आमदार राहुल पाटील यांनीही सूचक विधान करत, “शिवसेना ही नेते तयार करणारी फॅक्टरी आहे, कोणासाठी वेळ थांबत नाही,” असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत बदलांची शक्यता अधिक बळावली आहे. तसेच त्यांनी भाजपावर टीका करत, “पक्षात जास्त लोक घेतल्याने तो टिकत नाही,” असेही नमूद केले.
सध्याच्या घडामोडींमुळे ठाकरे गटात सर्व काही सुरळीत नसल्याचे स्पष्ट होत असून, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.