रात्रीच्या अंधारात घरात घुसायचे अन्..एकापाठोपाठ 20 गुन्हे; वेशांतर करून वीटभट्ट्यांवर लपायचे, शेवटी झाला ‘गेम’

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या एका आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. घरात घुसून नागरिकांना शस्त्रांचा धाक दाखवत मारहाण करणे आणि सोन्या-चांदीसह रोख रक्कम लुटणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणाऱ्या या टोळीने तब्बल 20 गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जूनच्या मध्यरात्री दौंड तालुक्यातील बाबीरनगर, आवदेवस्ती, आवाळेवस्ती, खोरवडी तसेच शेजारच्या श्रीगोंदा परिसरात एकाच रात्री पाच ठिकाणी दरोडे टाकण्यात आले होते. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 13 जून रोजी कारवाई करत टोळीतील तिघांना अटक केली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात गणेश काळे, विशाल काळे आणि किशोर भोसले यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 17 तोळे सोन्याचे दागिने, 324 ग्रॅम चांदी आणि इतर चोरीचा ऐवज असा सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासात मुख्य आरोपींसह टोळीतील सदस्यांवर यापूर्वीही चोरी आणि दरोड्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या टोळीतील काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.