काळेवाडीत मध्यरात्री रक्ताचा खेळ! “तो पुन्हा येणार…” या भीतीतून तरुणाचा कोयत्याने खात्मा

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीत रविवारी मध्यरात्री असा थरार घडला की, संपूर्ण परिसर दचकून उठला. जुनं वैर, एकतर्फी प्रेमाचं प्रकरण आणि “तो पुन्हा मुलीच्या मागे लागणार” ही भीती… या सगळ्या संतापाचा शेवट थेट रक्ताच्या थारोळ्यात झाला. भररस्त्यात धारदार शस्त्राने तरुणावर सपासप वार करत त्याचा खात्मा करण्यात आला, तर त्याचा मावसभाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर काळेवाडी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मृत तरुणाचं नाव हमीद शेख असं असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत सूर्यवंशी आणि विशाल सूर्यवंशी या दोघांनी धारदार शस्त्राने हमीद आणि अर्षद यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात हमीद शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशी याला रात्रीच ताब्यात घेतलं. तर दुसरा आरोपी विशाल सूर्यवंशी हा हल्ल्यानंतर पसार झाला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचत त्यालाही अखेर अटक केली आहे. दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या हत्येमागचं कारण ऐकून पोलिसही हादरले आहेत. प्राथमिक तपासात जुना वाद आणि एका तरुणीशी संबंधित प्रकरणातून हा हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. हमीद शेख हा अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. चार महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप होता. त्यावेळी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.

हमीद बाहेर आल्यानंतर तो पुन्हा मुलीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना सतावत होती. विशेष म्हणजे संबंधित तरुणीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीच्या आईनेही आरोपींकडे “तो पुन्हा मुलीच्या मागे लागेल” अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने पोलिस आता या संपूर्ण प्रकरणाचा खोलात जाऊन तपास करत आहेत.
या घटनेमुळे काळेवाडी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.