इथेनॉलवरून भाजप खासदारांचा पारा चढला! ‘शुद्ध पेट्रोल’ मागणाऱ्यांना थेट सवाल; म्हणाले, “बापाच्या घरातून आणायचं का?”

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या मुद्द्यावरून देशात सुरू असलेल्या चर्चेला आता भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्यामुळे वेगळे वळण मिळाले आहे. मध्य प्रदेशातील रीवा मतदारसंघाचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कोलकाता-रीवा-भोपाळ विमानसेवेच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान नागरिकांना संबोधित करताना मिश्रा यांनी भारताच्या इंधन गरजेपासून ते आंतरराष्ट्रीय परिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारत आपल्या एकूण गरजेपैकी केवळ २० टक्के खनिज तेलाचे उत्पादन करतो, तर उर्वरित सुमारे ८० टक्के तेल परदेशातून आयात करावे लागते, असा दावा त्यांनी केला.

आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा तेल पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगताना त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत तेलाला मोठा फेरा मारून भारतात आणावे लागत आहे. त्यामुळे देशाने इंधनाच्या बाबतीत पर्यायी मार्गांचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.


याच पार्श्वभूमीवर त्यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाला विरोध करणाऱ्यांना प्रश्न केला. काही जण रस्त्यावर उतरून आंदोलन करत ‘इथेनॉल नको, केवळ शुद्ध पेट्रोल द्या’ अशी मागणी करत आहेत. मात्र, देशात शुद्ध पेट्रोलच उपलब्ध नसताना ते आणायचे कुठून, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येईल का?” असे आक्रमक वक्तव्य केले.
मिश्रा यांनी इथेनॉलच्या वापराचे समर्थन करण्यासाठी ब्राझीलचे उदाहरणही दिले. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे सांगत भारतातही इथेनॉलवर चालणारी वाहने तयार करण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला. वाहन उत्पादक कंपन्यांकडे इथेनॉलवर चालणारे इंजिन तयार करण्याची क्षमता असल्याचेही ते म्हणाले.
याशिवाय भारतातील रोजगारनिर्मिती, महागाई आणि संरक्षण साहित्याच्या निर्यातीबाबतही त्यांनी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. भारत आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी देशाच्या आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख केला.
मात्र, भाषणातील इतर मुद्द्यांपेक्षा ‘शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरून येईल का?’ या वक्तव्याचीच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा सुरू आहे. इथेनॉल मिश्रणाचा फायदा-तोटा, वाहनांवरील परिणाम आणि देशाची इंधन आयातीवरील अवलंबित्व यावर सुरू असलेल्या चर्चेला या वक्तव्यामुळे पुन्हा जोर आला आहे.