उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात भाजपची फिल्डिंग ; घेतला मोठा निर्णय, पक्षाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पक्षस्तरावर निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार असं वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे, मात्र पदाधिकारी स्वबळाचा नारा देत असल्याच दिसून येत आहे. अशातच एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात आता भाजपने बिल्डिंग लावल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली, जिल्हाप्रमुख या नात्याने नरेश म्हस्के यांनी ही बैठक घेतली होती, मात्र या बैठकीमध्ये ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. यापुढे युतीबाबत केवळ एकनाथ शिंदे हेच भाष्य करणार, कोणी भाष्य केल्यास तर त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल असा निर्णय झाल्याची माहिती देखील मिळत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पहाता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लढवल्या जाणार की काही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही.

