बिग अपडेट! मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण, सुरक्षा आणि कायद्याबाबत मोठे निर्णय…

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षण आणि कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.

या बैठकीत आदिवासी भागातील शिक्षण व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेण्यात आला. पाच प्राथमिक शाळांना माध्यमिक स्तरावर, तर १९ माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि आर्थिक तरतुदीस आदिवासी विकास विभाग कडून मंजुरी देण्यात आली आहे.
दरम्यान, सोलापूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२६-२७ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या तीन नवीन पदवी अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्येक शाखेसाठी ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आली आहे.

तसेच, तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार तांत्रिक शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे.

कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा निर्णय घेत, लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल न देण्याबाबत कठोर कायदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी विधी व न्याय विभाग यांना आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्व निर्णयांमुळे शिक्षण क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे.